*आईच्या माघारी बहीणच आई असते देवा !*
( भाऊबीज , रक्षाबंधन आणि ओवाळणी )
*कवी : प्रा.विजय पोहनेरकर*
*कोण म्हणतं बहीण*
*ओवाळणी साठी ओवाळते*
*भावासाठी बिचारीचे*
*अंतःकरण तळमळते*
*भाऊरायाच्या रूपाने*
*माहेर येतं घरी*
*म्हणून येतात काळजात*
*आनंदाच्या सरी*
*या निमित्ताने तिला वाटतं*
*भावाशी खूप बोलावं*
*माहेरच्या फांदीवर*
*क्षणभर तरी डोलावं*
*कशी आहेस ? एवढाच प्रश्न*
*सुखाऊन जातो*
*दुःखात सुद्धा एखाद-दुसरा*
*आनंद अश्रू येतो*
*साडी आणली का नोट*
*कोणी पहात नाही*
*भाऊ दिसे पर्यंत तिला*
*घास जात नाही*
*लग्न होऊन सासरी जाणं*
*खूप कठीण असतं*
*बाप नावाच्या आईला*
*सोडून जायचं असतं*
*उपटलेल्या रोपट्या सारखं*
*सोडावं लागतं माहेर*
*जन्मदात्या आई कडून*
*स्वीकारावा लागतो आहेर*
*वाटतो तितका हा प्रवास*
*सहज सोपा नसतो*
*भावासाठी काळजात एक*
*सुंदर खोपा असतो*
*रक्षाबंधन ,भाऊबीज हे*
*फक्त नाहीत सण*
*बहिणी साठी ते असतं*
*समाधानाचं धन*
*सुरक्षेचं कवच आणि*
*पाठीवरचा हात*
*बहिणींसाठी भाऊ म्हणजे*
*दुःखावरची मात*
*कुणीतरी आपलं आहे*
*भावनाच वेगळी असते*
*म्हणून बहीण दाराकडे*
*डोळे लाऊन बसते*
*रक्षाबंधन , भाऊबीज*
*दिवस राखून ठेवा*
*आईच्या माघारी बहीणच*
*आई असते देवा*
Comments
Post a Comment